Sunday, 10 March 2019

क्रीडाप्रेमी दादा ( कबड्डी )



भाग 4 - क्रीडाप्रेमी दादा (कबड्डी )

महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा खेळ पूर्वीपासून खेळला जात आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी या खेळाचा प्रसार व प्रचार करण्यात कसलीही कमी भासू दिली नाही. त्या नेत्यांपैकी एक आहे मा. शरदचंद्र पवार. शरद पवार साहेब हे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष असताना त्यांनी कबड्डी या खेळाला देशातच नव्हे तर आशिया खंडात नेवून ठेवले.परंतू नंतर शरद पवार साहेब केंद्राच्या राजकारणात गेल्याने त्यांना या खेळाकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या नंतर अध्यक्ष पदाकरीता अनेक नावे आली पण सर्वांच एकमत झाल ते मा. अजितदादा पवार या नावावर.
अजितदादांनी अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर सर्वात आधी या असोसिएशनची आर्थिक बाजू मजबूत करण्यावर भर दिला. विजयी संघातील प्रत्येक खेळाडूला दहा हजार रुपये देण्याचे चालू केले. त्याचबरोबर अजितदादांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे संस्थापक बुवा साळवी यांचा जन्मदिवस हा कबड्डी दिवस म्हणून चालू केला आणि या दिवशी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या संघास रोख स्वरुपात बक्षीस देण्याची व्यवस्था केली.
कबड्डी स्पर्धेस चालना मिळण्यासाठी दादांनी शिवशाही चषक चालू केला. या चषकाकरीता असलेला 25 लाखांचा निधी अपुरा पडत असल्याने तो दादांनी 50 लाखांचा निधी सरकार कडून मंजूर करून घेतला. तसेच कबड्डी व खो-खो खेळाकरिता देण्यात येणार्‍या निधी मध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही याचीही व्यवस्था करून ठेवली.
अजितदादांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रशस्त असे मुख्यालय दादर, मुंबई येथे बांधुन घेतले. हे  मुख्यालय पाहिल्यावर कबड्डी हा खेळ आता मागे राहिला नाही याची जाणीव करून देते असे भव्य-दिव्य मुख्यालय बांधण्यात आले आहे. पहिल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील भारतीय संघातील महाराष्ट्रातील महिला खेळाडूस प्रत्येकी एक कोटी रुपयांचे तसेच प्रशिक्षकास पंचवीस लाखांचे बक्षीस देण्याची व्यवस्था दादांनी केली आहे. त्याचबरोबर शासकीय नोकरी मध्ये 5% जागा खेळाडूकरिता राखीव ठेवण्याचे काम दादांनी केले आहे.
अजितदादांनी जेव्हापासून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतलीये तेव्हा पासून कबड्डी खेळाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे.

क्रीडाप्रेमी दादा ( खो-खो )



भाग 3 - क्रीडाप्रेमी दादा ( खो-खो )

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची स्थापना 1956 मध्ये भाई नेरूरकर यांनी केली. या असोसिएशनचे 32 वर्ष मा. शरदचंद्रजी पवार अध्यक्ष होते. नंतरच्या काळात शरद पवार साहेब केंद्राच्या राजकारणात गेल्याने त्यांना या असोसिएशनला पुर्वीसारखा वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी 2005 साली या असोसिएशनचा राजीनामा दिला. असोसिएशनच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार साहेबांना विनंती केली की या असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजितदादा पवार यांची नियुक्ती करावी. यानुसार 2006 मध्ये अहमदनगर येथे झालेल्या असोसिएशनच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. दादा अध्यक्ष झाल्यापासून खो-खो खेळामध्ये आमूलाग्र बदल होत गेले याचे कारण म्हणजे दादांचा असलेला शिस्तप्रिय स्वभाव.
अजिंक्यपद स्पर्धा भरवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला राज्य संघटनेच्या वतीने दादांच्या सहकार्याने आठ लाख रुपयांची मदत केली जाते. पूर्वी राज्य व महापौरचषक स्पर्धेचे बजेट 2 ते 3 लाख असायचे परंतू दादा अध्यक्ष झाल्यापासून ते बजेट 15 लाख ते 2 कोटी रुपये झाले आहे. दादांच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या सेवेमध्ये 5% खेळाडू आरक्षणात खो-खो खेळाचाही समावेश केला गेला आहे.
12 डिसेंबर हा मा. शरदचंद्र पवार साहेबांचा जन्मदिवस. हा दिवस या संघटनेच्या वतीने खो-खो दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करून विजेत्यांचा रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येते.
आधी या संघटनेला कार्यालय नव्हते परंतू अजितदादांच्या सूचनेनुसार पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे कार्यालय तयार करण्यात आले. अजितदादा या संघटनेचे अध्यक्ष झाल्यापासून खो-खो खेळामध्ये नव-नवीन सुधारणा होत आहे आणि खऱ्या अर्थाने खो-खो खेळाला मान-सन्मान, पैसा आणि प्रसिद्धी मिळू लागली आहे.

Saturday, 9 March 2019

अजितपर्वाची सुरुवात


भाग 2 - अजितपर्वाची सुरुवात

अजितदादांनी आपल्या राजकीय कार्याची चुणूक दाखवून दिली ती 1983 मध्ये. त्यावेळी काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर राहून अजितदादांनी आपला पॅनल निवडुन आणला होता. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर अजितदादा 1984 मध्ये निवडुन गेले. नंतर 1991 मध्ये दादांची मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँक च्या अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दादांनी पुढची 16 वर्ष अध्यक्षपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. आज पुणे जिल्हा सहकारी बँक ने बॅंकिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे त्याचे श्रेय अजितदादांनाच जाते.
1991 मध्ये अजितदादा बारामती लोकसभा मतदार संघातून भरघोस मतांनी खासदार पदी निवडुन आले परंतु आपले चुलते मा. शरदचंद्र पवार यांच्याकरिता ती जागा सोडून दिली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड बारामती लोकसभा मतदार संघात समाविष्ट होते. दादांना पिंपरी-चिंचवड मधून सर्वाधिक मतदान पडले होते. त्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड मध्ये लक्ष घालून तिथे केलेला विकास आपण पाहतोच आहे.आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्यानंतर दादा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी निवडुन आले. जुन 1991 ते नोव्हेंबर 1992 या काळात सुधाकरराव नाईक यांच्या सरकार मध्ये अजितदादा कृषी व ऊर्जा राज्यमंत्री होते. नंतर 1992 मध्ये मा. शरदचंद्र पवार पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी दादांकडे साॅइल कंझरवेशन, पॉवर आणि प्लॅनिंग खाती सोपविण्यात आली. नंतर 1995 मध्ये दादा पुन्हा आमदार पदी निवडून आले. 1999 साली शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 1999 मध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर विलासराव देशमुख ( ऑक्टोबर 1999 - डिसेंबर 2003) यांच्या सरकार मध्ये अजितदादांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली व इरिगेशन विभागाचा कारभार सोपविण्यात आला. पुढे सुशीलकुमार शिंदे ( डिसेंबर 2003 - ऑक्टोबर 2004) यांच्या सरकार मध्ये इरिगेशन खात्याबरोबर रूरल विभागाचा कारभार सोपविण्यात आला.
2004 मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आल्यानंतर दादांकडे वॉटर रिसोर्स विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर दादांनी 2004 पासून 2014 पर्यंत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले.2009 साली पुन्हा सत्तेत आल्यावर अजितदादांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.2014 पासून अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल तसेच संघर्ष यात्रे मधून या फसव्या सरकार विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी परिवर्तन यात्रा काढण्यात आली होती. यातून अजितदादांनी लाखो जनतेच्या मनात आपल स्थान बनवलय.

अजितदादांच्या बालपणाविषयी

ज्यावेळी महाराष्ट्राचे राजकारण लिहिले जाईल त्यावेळी एका नावाभोवती राजकारण फिरले जाईल ते नाव म्हणजे अजितदादा पवार...
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांनी तडफदार, सडेतोड स्वभावामुळे आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे,त्यामुळेच महाराष्ट्राचे लाडके दादा कोण? अस म्हंटल की लगेच अजितदादांच नाव घेतल जात.
अजितदादांच्या बालपणाविषयी तसेच त्यांच्या राजकीय कार्याविषयी आपल्याला माहिती होण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करीत आहे.

भाग 1 - अजितदादांच्या बालपणाविषयी

देवळाली प्रवरा येथील बळवंतराव कदम-पाटील आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई कदम-पाटील यांना लक्ष्मणराव, मुकुंदराव, सर्जेराव, शरदचंद्र ही चार मुले तसेच आशाबाई, रत्नप्रभा, सुषमा, राजश्री या चार मुली असे एकूण आठ अपत्ये.
आशाबाई कदम यांचा विवाह बारामती येथील गोविंदराव आणि शारदाबाई यांचे तिसरे अपत्य अनंतराव पवार यांच्याशी झाला. अनंतराव आणि आशाबाई यांना चार अपत्ये.अजित, श्रीनिवास हे मुले तर विजया, नीता ह्या मुली.
अनंतरावांचे मोठे चिरंजीव अजितदादा. अजितदादांना लहानपणी प्रत्येक गोष्ट मनासारखी पाहिजे असायची यातून त्यांचे घरी त्याचप्रमाणे शाळेतही भांडणे व्हायची परंतु आजी शारदाबाई पवार ह्या एकदम कडक स्वभावाच्या. शारदाबाईंचे प्रत्येक नातवंडांवर लक्ष असायचे त्यामुळे अजितदादांचे फार काही काळ हे चालले नाही आणि त्यांच्या स्वभावात तसेच वागण्यात फरक होत गेला. अजितदादांचे वागणे लहानपणापासूनच शिस्तप्रिय. आपण बघतोय आजही दादांचे वागणे शिस्तप्रिय आहे आणि यामुळेच दादांनी जनतेच्या मनात आपल स्थान निर्माण केले आहे.
शाळेच्या सुट्टीच्या दिवशी दादा बारामतीहून काटेवाडीला यायचे. काटेवाडीला आल्यावर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट, कबड्डी, गोट्या या सारखे खेळ खेळायचे.
उन्हाळ्याच्या सुट्टीमधे दादा आपल्या मामाच्या गावी(देवळाली प्रवरा) यायचे. देवळालीला आल्यावर मामांच्या मुलांसोबतही खेळायचे आणि तिथेच रमायचे. देवळालीला आल्यानंतर दादांचा बारामतीला जाण्याकरता पायच निघत नसायचा. सर्व खेळामध्ये दादांना कबड्डी खेळायला खूप आवडायच आणि आणखी सांगायच म्हंटल तर दादा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे कित्येक वर्षापासुन ते आजपर्यंत अध्यक्ष आहेत आणि कबड्डी च्या खेळामध्ये केलेल्या सुधारणाही आपण पाहतोच आहे.
दादांनी मित्रमंडळीसोबत सार्वजनिक उत्सवही साजरे केलेत. ते करण्यात दादा पुढे असायचे. दादांनी राजकारणात येण्याच्या अगोदर शेती, दुग्ध तसेच पोल्ट्रीफार्म व्यवसाय केला होता.
अशाप्रकारे दादांनी बालपणात आणि तरुणपणात जे आत्मसात केले त्या जोरावर ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकले.

Saturday, 9 February 2019

भाजप बिथरली

काल पुण्यामध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गर्जना केली की यावेळी आमचे 43 खासदार निवडून येणार आहे आणि 43 वा खासदार हा बारामतीचा असेल. एकंदरीत भाजप सत्तेत आल्यापासूनची परिस्थिती पाहता कोणीही सांगेल की येत्या निवडणुकीत भाजपला जनता पूर्णपणे नाकारणार आहे. मागे पाच राज्याच्या झालेल्या निवडणुकीत जनतेने दाखवूनही दिले. 2014 मध्ये मोदी लाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामती मध्ये सभा घेण्याची हिम्मत झाली नाही तसेच कमळावर बारामती मध्ये भाजपने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. आणि आता देवेंद्र फडणवीस म्हणताय की 2019 मध्ये बारामतीचा खासदार आमचा(भाजपचा) असेल, तेव्हा हे इशारे किती पोकळ आहेत हे न समजायला जनता काय वेडी आहे का? भाजपचा सर्वे पण सांगतो महाराष्ट्रात 2014 ची पुनरावृत्ती होणार नाही. ज्या बारामतीमध्ये भाजपच्या अधिकृत चिन्हावर साधा नगरसेवकही निवडून येत नाही आणि फडणवीस चाललेत खासदार निवडून आणायला.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक काल म्हणाले भाजपचा बारामतीचा उमेदवार कोण मोदी, शहा की देवेंद्र? भाजपने बारामती मधून लिंबू टींबू ला उभे करण्यापेक्षा नरेंद्र मोदींनाच उभा कराव म्हणजे कस डायरेक्ट कॅप्टनलाच आउट करू.
मागे गिरीश महाजन ही असेच म्हंटले होते आणि आता नागपूरचा पोपटपंची करणारा पोपट. गिरीश महाजनांना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चॅलेंज दिलय की येऊन दाखवा बारामतीत, दाखवतो बारामती काय आहे ते. असेल हिम्मत तर दाखवाच येऊन. बारामतीचा नाद करायचा थांबवा नाहीतर बारामती संपावायच्या नादात तुम्ही संपवून जायचे.
त्याच कार्यक्रमामधे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आत्ताचे पंतप्रधान अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री योगेश गोगावले असल्याचा उल्लेख केला. फडणवीस साहेब तुमच्या नेत्यांना सांभाळा आधी त्यांना पंतप्रधान कोण आहे ते माहिती नाही आणि तुम्ही ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी करायच्या बाता करताय.
दोन दिवसापूर्वी न्यूज आली की शरद पवार साहेब माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार?? यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शरद पवारांनी माढ्यातून उभे राहू नये नाहीतर पराभूत होतील. चंद्रकांतदादा पाटील बहुधा विसरलेच वाटतय पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे म्हणाले होते, मी पवार साहेबांच बोट धरून राजकारणात आलोय आणि शिकलोय.नरेंद्र मोदी पवार साहेबांना गुरू मानतात आणि इतर मंत्री वेळोवेळी पवार साहेबांचे सल्ले घेतात. चंद्रकांतदादा पाटील तुमचा जन्म 1959 मध्ये झाला 1967 साली तुम्ही आठ वर्षाचे होता त्यावेळी शरद पवार साहेब बारामती मधून आमदार झाले होते आणि 50 वर्ष झालीत जनतेतून निवडुन आलेत. तुमची तर हिम्मतही नाही जनतेतून निवडुन येण्याची. तुम्ही आधी निवडून या मग दुसर्यांना सल्ला द्या. यावरून एकच दिसतय ही सर्व भाजप बिथरल्याची चिन्ह आहे. तुम्हाला येणार्‍या निवडणुकीत जनता धडा शिकवणारच.
-जगदीश ढुस
अहमदनगर जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी सोशल मीडिया ग्रामीण
देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहमदनगर 

Friday, 6 April 2018

मजेदार पॉलिटीक्स


काल कणकवली नगरपालिकेची निवडणूक पार पडली.कणकवली म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी नारायण राणे यांचे होमग्राऊंड किंवा आपण त्याला बालेकिल्लाही म्हणू शकतो.सध्या नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष साेडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे,त्यांच्या या पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती.नारायण राणे हे सध्या भाजपाचे खासदार आहेत.परंतू राणेंनी ज्या पक्षाचे खासदार आहे त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली.नारायण राणेंचे पूञ नितेश राणे यांनी या निवडणूकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या प्रचारात लक्ष घातले ते आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे.महाराष्ट्र स्वाभिमानच्या बाजूने असणारे नितेश राणे यांच्या काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंञपणे लढविली.या निवडणूकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आघाडी होती तर भाजपची शिवसेना सोबत युती होती.
मला प्रश्न पडत होता की,नारायण राणे,नितेश राणे तसेच इतर पक्ष या निवडणूकीच्या प्रचारात काय म्हणाले असतील.माझ्या मते,
नारायण राणे - माझ्या पक्षाला मतदान करू नका,माझ्या पक्षाला मतदान करा.
नितेश राणे - माझ्या पक्षाला मतदान करू नका,माझ्या वडीलांच्या एका पक्षाला मतदान करू नका,माझ्या वडीलांच्या दुसर्या पक्षाला मतदान करा.
भाजपा - आमच्या खासदाराच्या पक्षाला मतदान करू नका,आमच्या पक्षाला मतदान करा.
स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते - आमच्या पक्षाच्या संस्थापकाच्या पक्षाला मतदान करू नका,आमच्या पक्षाच्या प्रचाराची धुरा वाहणार्या आमदाराच्या पक्षालाही मतदान करू नका,आमच्याच पक्षाला मतदान करा.
आता काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना हे पक्ष काय म्हणाले असतील याचा विचारच न केलेला बरा.
आणखी एक,मी ही पोस्ट लिहीली पण तीन-चार वेळेस वाचूनही मला मी काय लिहील ते मलाही नीट समजलेल नाही,तुम्हाल समजल तर बघा.
~जगदिश ढुस
देवळाली प्रवरा,अहमदनगर

भाजपाचा स्वताचा कौतुक सोहळा

आज मुंबईत भाजपचा वर्धापन दिन मुंबईकरांना वाहतुकीचा ञास देत संपन्न झाला.माझ्या मते वर्धापनदिन म्हणण्यापेक्षा फेकाफेकीचा शो म्हटल तरी चुकीचे होणार नाही.भाजपाने वर्धापनदिनी फक्त राष्ट्रवादी व पवारांनाच टार्गेट केले गेले.का..?

सध्या राष्ट्रवादीचा माजी उपमुख्यमंञी तसेच भावी मुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा चालू आहे.सध्या समाजातील प्रत्येक घटक नाराज आहे त्यामूळे या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून दादांना प्रचंड जनाधार लाभत आहे.यावरून 2019 चे महाराष्ट्रातील चिञ काय असेल हे सांगण्याची गरजच नाही.

आज चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की छगन भूजबळांच्या बाजूला 2-3 कोठडी मोकळी आहे,असेलही मग त्यात विजय मल्ल्या,नीरव माेदींना टाका ना आणी राहीलेत अजितदादा,ज्यावेळी तुमचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस विधानसभेत दादांना क्लिनचिट देत होते त्यावेळी तुम्ही झोपले होते का.फडणविसांनीच कबूली दिली की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय फायद्यासाठी केले होते.तसा भ्रष्टाचारच झालेला नाही.

आज एका गोष्टीच खूप हासू आल,देवेंद्र फडणविस म्हणाले ना की,पवार साहेब औषधालाही शिल्लक राहणार नाही.ज्या शरद पवार साहेब नावाच्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष समाजकारण,राजकारणात घालविली,पवार साहेबांच्या सोबतचे नेते त्यात अटलबिहारी वाजपेयी,बाळासाहेब ठाकरे,गोपिनाथ मुंडे,देवेगौडा,व्ही.पी.सिंग,सोनिया गांधी अशी कित्येक नावे सांगता येतील.त्यातील काही ह्यात नाही,काही सक्रीय राजकारणातून रिटायर्ड झाली पण त्यांच्यातील एकमेव नेता पवार साहेब राञंदिवस काम करून समाजासाठी झटताेय,त्या पवार साहेबांबद्दल बोलताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला.पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी,देशासाठी काय योगदान दिले हे सांगण्याची गरज नाही ते सर्वांना माहीती आहेतच पण फडणविस तुमचे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ते एकदा सांगा. तुमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी पवार साहेबांचेच बोट धरून राजकारण शिकलेत हे तुम्ही बहूधा विसरले वाटत.

देवेंद्र फडणविसांनी तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनाही चहावाला म्हणून हिणवल आणि ज्या गोपिनाथ मुंडेनी भाजपला खर्या अर्थाने लोकांपर्यंत नेली त्यांचा विसर पडला की जाणूनबुजून विसरले कुणास ठाऊक.

अमित शहांनी विरोधकांना साप,कुञा,मुगूंसाची उपमा दिली सध्या तरी महाराष्ट्रात ऊंदीर,शेळी(वाघ),राजीनामे यावरच राजकारण चालू आहे,तशी परिस्थिती तुम्हीच आणून ठेवलीये.

सध्या राष्ट्रवादीला मिळणारा जनाधार पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागली हे नक्की,काहींना तर लूजमोशन झाली आणि काहींची सामना मधून तर भाजपाची आजच्या स्वताच्या कौतुक सोहळ्यातून बाहेर पडली.

~जगदिश ढुस

देवळाली प्रवरा,अहमदनगर

क्रीडाप्रेमी दादा ( कबड्डी )

भाग 4 - क्रीडाप्रेमी दादा (कबड्डी ) महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा खेळ पूर्वीपासून खेळला जात आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी या खेळाचा...